कृषी विभागातर्फे खरीप हंगामाकरिता रासायनिक खत व भात बियाणांचे नियोजन

ठाणे (जिल्हा परिषद, ठाणे) : जिल्हा कृषी विभागातर्फे आगामी खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी येत्या खरीप हंगामात खतांची, बियाणांची विक्री आणि वितरणासंदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते, बि-बियाणे याबद्दल कोणतीही अडचण येणार नाही यासाठी कृषी विभागाने सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

ठाणे जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 4,09,186 हेक्टर एवढे असून त्यापैकी खरीप हंगामा खालील सर्वसाधारण क्षेत्र 65,909 हेक्टर एवढे आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात मुख्यत: भात पिकाची लागवड केली जाते.त्याचप्रमाणे भाजीपाला,चारापिके,कडधान्य व काही प्रमाणात गळीत धान्य इत्यादी पिकांचीही लागवड केली जाते.

भातपिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र 55,000 हेक्टर एवढे असून मागील वर्षी 54,923  हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली होती व 4,989 हेक्टरवर इतर पिकांची लागवड करण्यात आली होती.

खरीप हंगाम 2025 मध्ये भात पिकाखालील अपेक्षित लागवडीखालील क्षेत्र 55,000 हेक्टर एवढे ग्रहित धरले असून त्यासाठी शासनाकडे 10,120 क्किंटल भात बियाणांची मागणी करण्यात आली आहे. खाजगी कंपन्यांचे 8,820 क्किंटल व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडील 1,300 क्किंटल बियाणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भाताचे अधिक उत्पन्न वाढण्यासाठी व संकरित पिकाखालील क्षेत्र वाढण्यासाठी 1, 360 क्विंटल संकरित बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

खरीप हंगामाकरिता शासनाकडे 10,324 मे. टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती. शासनाकडून ठाणे जिल्ह्याकरिता 11,122 मे टन रासायनिक खते मंजूर करण्यात आली आहेत. सदर खतांमध्ये युरिया 9,215 मे टन, डीएपी 167 मे टन,संयुक्त खते 1,700 मे. टन व इतर खते 140 मे.टन यांचा समावेश आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी एम.एम.बाचोटीकर यांनी दिली.
====================
ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज
संपादक : जी.डी.कदम,उपळेकर
बातम्या,व जाहिरातीसाठी संपर्क :
8451951623/8879986087
======================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Click to Whatsapp