मार्च महिना संपला.आता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची चाहूल सर्वांना लागली आहे. नगरा – नगरात , गावा – गावांत आता एकच कुजबुज अशी की, भीम जयंती जवळ आली.
जे दुसऱ्यासाठी जगले, ज्यांनी -ज्यांनी या देशासाठी महान कार्य केले, अशा महामानवांंची जयंती आपण साजरी करतो, अन करायलाच हवी कारण आताच्या व येणार्या पिढ्यांना त्यांचे महान कार्य समजायलाच हवे. अश्या महामानवांच्या कार्याचे ऋण न फिटणारे आहेत. जयंतीत नाचून त्यांच्या कार्याचे ऋण फिटणारे आहेत का? याचा खोलवर विचार आजच्या तरुण पिढीने करायला हवा.
वर्गणी जमा केल्यानंतर तो पैसा वाया जाणार नाही किंवा त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी जयंती मंडळाच्या अध्यक्षांनी सजग रहायला हवे. भला मोठा डीजे लावायचा अन दारू पिऊन नाचायचे, जयंतीत आपल्यात आपल्यांनीचं हाणामारी करायची, एकमेकांचा धक्का जरी लागला तरी आजच्या तरुण पिढीला सहन होत नाही त्याच रूपांतर मोठ्या भांडणात होऊन खुना – खुनी होते ही कसली जयंती ? आपल्या महामानवाची अशी जयंती साजरी करताना आपल्याला लाज वाटायला हवी .त्यामुळे तुम्ही अशी जयंती साजरी करू नका.
जयंती साजरी करायची असेल तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करा, निबंध स्पर्धा घ्याव्या, भाषण स्पर्धा घ्याव्या, गीत गायन स्पर्धा घ्याव्या, अठरा तास अभ्यास स्पर्धा घ्याव्यात, अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करून जयंती साजरी करावी किंवा पैशांचे बचत करून ग्रंथालय उभे करावे अणि त्यामधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा व इतर महामानवांचे पुस्तक उपलब्ध ठेवावीत जेणे करून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल आणि त्याचा फायदा तरुण पिढीला होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होईल, समाज सुधारण्यासाठी त्याचा उपयोग होईल. सर्वानी नाचून नाही तर पुस्तक वाचून जयंती साजरी करावी.
जयंती साजरी करताना आपण एका महामानवाची जयंती साजरी करीत आहोत, याचे तरी भान ठेवावे. तुम्हाला जर जयंती निट नेटकेपणाने साजरी करता येत नसेल तर साजरी करू नका, अश्या पद्धतीने जयंती साजरी करून त्यांचा अपमान तरी करू नका. वर्गणीत जमा केलेला पैसा हा फक्त श्रीमंताचाच नसतो तर त्यात गरीब कष्टकरी समाजाचा पण असतो हे विसरता कामा नये. त्यांच्या पैश्याच्या जोरावर नाचण्यात कसली मजा ? अरे नाचण्यात वेळ वाया घालवू नका, वाचनात वेळ घालवा आणि कुणीही आपल्याकडे बोट दाखवणार नाही अशी जयंती साजरी करा.
सर्वच महामानव हे कुठल्याही जाती धर्माच्या पुरते मर्यादित नाहीत. त्यांनी या देशासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकांसाठी महान असेच कार्य केलेले आहे. त्यांनी या देशात समता, स्वातंत्र्य, बंधुता व मानवता धर्म रुजविला.अश्या महामानवांची जयंती सर्व धर्मियांनी साजरी करायला हवी.
जयंती मजा म्हणुन साजरी करायची नसते किंवा करायची म्हणुन साजरी करायची नसते, त्या महामानवांच्या विचारांचे आव्हान आपल्यापुढे आहे. पोहोचता येत असेल तर तिथपर्यंत पोहोचा,त्यांचे विचार अंगीकारा. भीमाला डोक्यावर घेऊन नाचण्या पेक्षा त्यांचे विचार डोक्यात घ्या, क्रांती घडवा,त्यांच्या विचारांचा आदर करा, सत्याच्या वाटेने चला, त्यांच्या उपकारांची जाण ठेऊन जयंती साजरी करा.
सौ.सुनंदाताई संजय भगत
(नांदेड)
====================
ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज
संपादक : जी.डी.कदम,उपळेकर
बातम्या,व जाहिरातीसाठी संपर्क :
8451951623/8879986087
======================