जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांचा  सत्कार

ठाणे (जिल्हा परिषद, ठाणे) : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभाग अंतर्गत पंचायत समिती अंबरनाथ तर्फे ग्रामपंचायत वांगणी येथे गावातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनानिमीत्त सत्कार करण्यात आला आहे. यावेळी कसलीही खंत बाळगू नका,आपण गरुड झेप घेत राहू असे प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी निता चव्हाण यांनी केलं.

माझे लग्न झाले तेव्हा मी कमी शिकली होती. शिकण्याची जिद्द ठेवून संसार सांभाळून आज मोठ्या हुद्द्यावर आहे. जिवनात अनेक संकटे आली पण जिद्द सोडली नाही म्हणून महिलांनी खंत बाळगू नये महिलांनी गरुड झेप घेतली पाहिजे असे मार्गदर्शन निता चव्हाण यांनी केले  शिक्षिका जयश्रीताई गायकवाड,  वैद्यकीय अधिकारी डॉ. उमा शंकर गृप्ता, शिक्षीका भारती कदम, माहिती शिक्षण संवाद तज्ञ प्रमिला सोनवणे‌ आदी महिलांनी त्याचे मनोगत व्यक्त केले.

जागतिक महिला दिनानिमित्त उमेद अंतर्गत बचत गटातील महिला, किशोरवयीन मुली, विद्यार्थीनी,स्वच्छता कर्मचारी, पाणी व स्वच्छता समितीचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य आणि समुदयातील प्रभावशाली लोकांचा समावेश करून पाणी, स्वच्छता व आरोग्य संबंधित संदेशाद्वारे जनजागृती करण्यात आली तसेच सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष महिला सभेचे आयोजन करण्यात आले.‌ सभेत पाणी, स्वच्छता व आरोग्य संबंधित कार्यक्रमाच्या अंमलबजावणी दरम्यान सद्यस्थितीत येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा, कथा कथन सत्र, पथनाट्य, मासिक पाळी व्यवस्थापन, Ftk किट चाचणी करण्यात आली.

ग्रामस्तरावर पाणी, स्वच्छता व आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वच्छता कामगार महिला, स्वच्छतेच्या मालमत्तेचे परिचालन, देखभाल व दुरुस्ती संबंधित सुयोग्य व्यवस्थापन करणारे महिला नेतृत्व, किशोरवयीन चॅम्पियन, क्षेत्रीय तपासणी संचाच्या सहाय्याने पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण करणाऱ्या महिलांचा, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, शिक्षिका, वकील, रांगोळी, मेहंदी, कराटे, नुत्य क्षेत्रात प्राविण्य संपादन केलेल्या महिलांचा गौरव सरपंच वनिता आढाव यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात सफाई कामगार व कर्मचारी महिला यांच्या दिप प्रज्वलन करून करण्यात आले. वृक्षारोपण व महिलांचे विविध खेळ घेण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गितांजली शेलार तर आभार समूह समन्वयक वैदेही वेखंडे यांनी केले. जागतिक महिला दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी दिलीप इंगळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
====================
ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज
संपादक : जी.डी.कदम,उपळेकर
बातम्या,व जाहिरातीसाठी संपर्क :
8451951623/8879986087
======================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Click to Whatsapp