कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी कल्याण पूर्व “५/ड” प्रभागातील मोठे, मध्यम आणि लहान नाल्यांच्या स्वच्छतेसंदर्भात सविस्तर बैठक आज घेतली. या दरम्यान तेथील नालेसफाईचे काम अत्यंत असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आले.
सदर कामात होत असलेल्या दिरंगाईवर आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदारास तात्काळ मनुष्यबळ वाढवण्याचे, यांत्रिकी पद्धतीने कामास गती देण्याचे तसेच कामाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
तसेच,रस्त्यांवर साफसफाईनंतर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असल्याने त्यांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करून त्वरित हटविण्याच्या सूचनाही दिल्या.
कामातील हलगर्जीपणाबद्दल आयुक्तांनी ठेकेदारास *‘काळ्या यादी’*त टाकण्यात येईल असा इशारा दिला असून,महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, वस्तू व सेवा कर कायदा (GST), आपत्ती व्यवस्थापन कायदा व कामगार कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांनी कल्याण पश्चिम “३/क” प्रभाग कार्यालयात बैठक घेतली. त्यांनी१५ मे पूर्वी सर्व मोठे, मध्यम व लहान नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना दिले.
या बैठकीस उपआयुक्त अतुल पाटील,३/क चे सहा. आयुक्त धनंजय थोरात,५/ड चे सहा.आयुक्त उमेश यमगर, संबंधित ठेकेदार, मुख्य स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या वतीने येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी संपूर्ण शहरातील नालेसफाईचे काम वेळेत, सक्षम व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितले. त्याचप्रमाणे इतर प्रभागातही नालेसफाई आणि इतर बाबींचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाईल अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिली.
====================
ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज
संपादक : जी.डी.कदम,उपळेकर
बातम्या,व जाहिरातीसाठी संपर्क :
8451951623/8879986087
======================